भटके विमुक्त समाज गावकुसाबाहेर पाले टाकून राहतो. या भागात शासनाच्या शाळा असतात पण या समाजातील मुलांना त्यांच्या राहणीमानामुळे , अस्वच्छता, भाषेत असलेली तफावत, जगण्यासाठी मागावी लागणारी भिक्षा अशा अनेक कारणाने त्यांचे शाळेशी समायोजन होवू शकले नाही. त्यामुळे पुर्व प्राथमिक शिक्षणाशी ते जोडले न गेल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात पुढील अनेक वर्षे ते येण्याची कुठलेही चिन्ह नाहीत.
भटके विमुक्तातील अनेक समाज जसे डोंबारी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मसनजोगी, बहुरूपी या समाजात कुटुंबाचा प्रमुख आधार मुलेच असतात. कुटुंबाला जगविण्यासाठी भिक्षा मागून, कसरती करून, भविष्य सांगून, अभिनय करून, कुटुंबाचे पालनपोषण करतात. यामुळे नियमित शाळेची वेळ, शाळेची शिस्त, शाळेचा दिलेला अभ्यासक्रम पाळणे अतिशय कठीण बाब आहे. यामुळे भटके विमुक्त समाजात शाळाबाहय मुलांची संख्या अधिक दिसून येते.
भटके विमुक्त समाजातील मुले पुर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ते राहत असलेल्या ठिकाणी म्हणजे पालावरती शाळापुर्व शिक्षण व पुर्व प्राथमिक शिक्षण मिळण्याची योजना करण्यात आली. यालाच “पालावरची शाळा / अभ्यासिका” म्हणतात. त्यांची भाषा, जिवनव्यवहार, त्यांचे निसर्गज्ञान, कलाज्ञान, त्यांचा परिसर यांची प्रचलित अभ्यासक्रमाला जोड देवून अनौपचारिकरित्या तसेच अतिशय लवचिक व परिवर्तनशिल अभ्यासक्रम असलेली शाळा / अभ्यासिका चालविली जाते. पालावरती शिक्षकाला वेळोवेळी येणारे अनुभव या आधारे अभ्यासक्रम विकसित होत जावून या वस्तीतील मुलांचे प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील शाळेत जाण्याची क्षमता तयार करण्यासाठी पालावरच्या शाळा/अभ्यासिकेची आवश्यकता आहे.
पालावरची शाळा / अभ्यासिकाही भटके विमुक्त समाजाच्या मुलांच्या सोयीनुसार भरणारी आहे. या शाळा / अभ्यासिकेला विशिष्ट जागा नाही, गणवेश नाही, स्थिर जागा नाही, अभ्यासक्रम नाही, अगदी परीक्षासुध्दा नाही. प्रमाणशाळेच्या वेळा सोडून मुलांच्या सोयीने त्यांची शाळा / अभ्यासिका घेतली जाते. ही शाळा / अभ्यासिका दोन ते तीन तास असते. त्यांची भाषा येणाऱ्या व्यक्तिला शिक्षक / शिक्षीका म्हणून नेमले जाते. 95 टक्के महिलाच या शाळा / अभ्यासिकेवर शिक्षक म्हणून काम बघतात. मुलांच्या बोली भाषेप्रमाणे, खानपानाच्या सवयीप्रमाणे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला जातो. चार ते 14 वयोगटातील मुले ही या शाळेचा भाग आहेत. पालावरच्या लोकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगत या शाळेत मुलांना पाठवण्यासाठी संबंधीत शिक्षक प्रयत्न करत असतात
अ.क्र. | प्रांत | शाळा संख्या | समाज | जिल्हे | मुलांची संख्या |
---|---|---|---|---|---|
1 | देवगिरी | 22 | 15 | 4 | 689 |
2 | पश्चीम महाराष्ट्र | 29 | 11 | 4 | 840 |
3 | कोकण | 12 | 8 | 4 | 421 |
एकूण | 63 | 25 | 12 | 1950 |
अ.क्र. | प्रांत | जोडलेले डॉक्टर | आरोग्य शिबीर संख्या | दरमहा लाभार्थी | लसीकरण |
---|---|---|---|---|---|
1 | देवगिरी | 22 | 20 | 698 | वर्षातून 4 वेळा |
2 | पश्चीम महाराष्ट्र | 3 | 4 | 200 | वर्षातून 2 वेळा |
3 | कोकण | 2 | 4 | 150 | वर्षातून 2 वेळा |