शिक्षण

भटक्या-विमुक्तांच्या समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा

अधिक वाचा
स्वावलंबन

जेंव्हा स्वस्थ राहील भटका समाज तेंव्हाच होईल भारत बलवान

अधिक वाचा
सन्मान

सन्मानानेच होईल भटक्या समाज्याचे पुनरुत्थान

अधिक वाचा
सुरक्षा

भटके विमुक्तांचे होईल परिवर्तन, जेंव्हा होईल त्यांचे संघटन.

अधिक वाचा
work-image
work-image
work-image

कोण आहेत भटके व विमुक्त?

भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे. समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू” या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून एकत्र नांदतो आहे. काळाच्या ओघात या समाजव्यवस्थेला वैगुण्याची कीड लागली. जातीतून अस्पृश्यता जन्माला आली. व्यवसाय, सामाजिक व्यवहार यांच्याऐवजी जात जन्मानुसार ठरू लागली. बहुसंख्य समाज या अस्पृश्यतेच्या, विषमतेच्या रोगाचा बळी ठरला.

याच समाजात असणारा एक घटक म्हणजे भटके व विमुक्त होय. 48 प्रमुख व 200 उपजातींत विखुरलेला हा समाज कायमचा समाजव्यवस्थेबाहेर फेकला गेला. आधी येथील समाजव्यवस्थेने आणि नंतर परकीय आक्रमकांनी या भटके-विमुक्तांना देशोधडीला लावले. सांगायला गाव नाही, राहायला घर नाही, अशी दैन्यावस्था या समाजावर आली. मुळात हा भटके-विमुक्त समाज म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.

आपल्या देशाला प्राचीन काळापासून एक समृध्द वारसा लाभला आहे. आपला देश अनेक क्षेत्रांत अग्रस्थानावर होता. जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश होता. अजिंठा व वेरूळची लेणी, अशोकस्तंभ ही त्यांची काही उदाहरणे होत. एका चिरंतन संस्कृतीचा वारसा आपल्या समाजाला लाभला आहे आणि या संस्कृतिकचे वाहक होते आज ज्यांना भटके-विमुक्त म्हटले जाते ते समाजबांधव.

भटके व विमुक्त विकास परिषदेची जडणघडण

यमगरवाडी सेवा प्रकल्प

एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा

एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा 1996 मध्ये सरकारी मान्यता मिळालेली पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे या शाळेत 400 विद्यार्थी आहेत अनुदान 120 मुलांना मिळते उरलेल्या मुलांचा खर्च हा समाजातून देणगी वस्तुरूप मदत यातून भागविला जातो सुरूवातीपासून या आश्रम शाळेने काही वैशिष्ट्ये जपली आहेत भटके-विमुक्त समाजाचे जीवन लक्षात घेऊन या मुलांचे भावविश्व खुलवण्याचा प्रयत्न होतो त्यांचे अंगभूत गुण असलेले निसर्ग ज्ञान कला-क्रीडा विकसित करण्याकडे लक्ष दिले जाते लवचिक व्यवस्थापन व शिस्त यातून शाळा चालवली जाते

एकलव्य माध्यमिक शाळा

1992 साली यमगरवाडी, तुळजापूर येथे एकलव्य विद्यार्थी विकास वसतिगृह सुरू झाले. 1996 मध्ये प्राथमिक आश्रमशाळा सुरू झाली आणि 2002 मध्ये पहिली सातवीची तुकडी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इतरत्र पाठवण्यात आले, पण अडचणी आल्यामुळे प्रतिष्ठानने स्वतःची माध्यमिक शाळा सुरू केली. 2005 पासून माध्यमिक आश्रमशाळा सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक आणि अभ्यासात उल्लेखनीय यश मिळवले. 2006 मध्ये पहिली दहावीची तुकडी उत्तीर्ण झाली आणि गुणवत्तावाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे दहावीचा निकाल सातत्याने 100% लागतो. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे शाळेची जागा अपुरी पडू लागली. सलग 10 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष अधिकारातून शाळेस शासकीय मान्यता मिळाली. आजपर्यंत शाळेतून अनेक विद्यार्थी इंजिनिअर, शिक्षक, डॉक्टर व नर्स झाले आहेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पालावरची शाळा

भटके विमुक्त समाज गावकुसाबाहेर पाले टाकून राहतो. या भागात शासनाच्या शाळा असतात पण या समाजातील मुलांना त्यांच्या राहणीमानामुळे, अस्वच्छता, भाषेत असलेली तफावत, जगण्यासाठी मागावी लागणारी भिक्षा अशा अनेक कारणाने त्यांचे शाळेशी समायोजन होवू शकले नाही. त्यामुळे पुर्व प्राथमिक शिक्षणाशी ते जोडले न गेल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात पुढील अनेक वर्षे ते येण्याची कुठलेही चिन्ह नाहीत. भटके विमुक्तातील अनेक समाज जसे डोंबारी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मसनजोगी, बहुरूपी या समाजात कुटुंबाचा प्रमुख आधार मुलेच असतात. कुटुंबाला जगविण्यासाठी भिक्षा मागून, कसरती करून, भविष्य सांगून, अभिनय करून, कुटुंबाचे पालनपोषण करतात. यामुळे नियमित शाळेची वेळ, शाळेची शिस्त, शाळेचा दिलेला अभ्यासक्रम पाळणे अशक्य आहे. अशा बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगळ्या प्रकारची शाळा, वेगळ्या प्रकारचा शिक्षणाचा कार्यक्रम गरजेचा आहे. पालावरची शाळा ही त्यासाठी सुरू केली आहे. येथे वेगळ्या प्रकारची शाळा असते. ज्यात जास्त वेळ सामाजिक, सृजनशील, कलाप्रधान उपक्रम घेतले जातात. या मुलांचे भावविश्व खुलते. हळूहळू मुख्य प्रवाहाकडे त्यांना आणले जाते.

शबरीमाता कन्या वस्तीगृह

भटके विमुक्त समाजाच्या मुलींना सुदूर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवणे ही मोठी समस्या आहे. यासाठी शबरीमाता कन्या वस्तीगृह चालविले आहे. येथे मुली सुरक्षित राहू शकतात, शिक्षण घेऊ शकतात व संस्कार घेऊ शकतात.

क्रीडाकुल

क्रीडा कूल अतिशय काटक लवचिकपणा व चपळता या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे भटके समाजातील मुली मुले विविध खेळांमध्ये रस घेतात यातूनच क्रीडा कुलाची निर्मिती झाली मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे देण्यात येते मल्लखांब मैदानी खेळ नेमबाजी बुद्धिबळ कबड्डी इत्यादी खेळांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य पातळीपर्यंत मजल मारलेली आहे

सांस्कृतिक दल

सांस्कृतिक दल संगीत गायन अभिनय लोककला कारागिरी इत्यादी अनेक गुण या मुलांमध्ये उपजत आहेत भटके समाजातील मुलांनी शाळेत रमावे त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून या दलाची निर्मिती झाली प्रकल्पातील अनेक मुले खूप सुंदर अभिनय करतात बालविवाह अंधश्रद्धा जातीयता स्त्रीभ्रूणहत्या इत्यादी विषयांवर प्रकल्पातील विद्यार्थी पथनाट्य सादर करतात परिसरातील विविध उत्सवांमध्ये येथील विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतात कार्यक्रमाच्या रचनेपासून सूत्रसंचालना पर्यंतची सर्व कामे कुशलतेने करतात

अनसरवाडा सेवा प्रकल्प

अनसरवाडा सेवा प्रकल्पांतर्गत विविध सामाजिक उपक्रम चालविले जातात ज्याचा उद्देश भटके विमुक्त समाजाच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे. गोपालन करतात म्हणून गोपाळ, खेळ करतात म्हणून खेळकरी, कुस्ती व मेहनतीचे काम करतात म्हणून पहिलवान अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा गोपाळ समाज विविध कसरतीचे खेळ करून आपली उपजीविका करतो. हे लोक कसरतीचे खेळ करतात पण घरात चूल पेटत नाही. घरही नाही, पालही नाही, मग चूल पेटणार कोठे? लोक देतील ते भीक, शिळे तुकडे पाण्यात बुडून पोटाची खळगी भरणारा हा समाज. गोपाळ समाज विकास परिषदेने खेळकरी गोपाळांना हक्काचे गाव, हातांना काम आणि निवासाला घर मिळावे म्हणून गोपाळ समाजातील लोकांना सोबत घेऊन अनसरवाडा, ता. निलंगा जि. लातूर येथे सेवा प्रकल्प सुरू केला. भिक्षेवर जगणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी लावणे, मुलांना शिक्षण, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काम, बॅंड पथकाच्या माध्यमातून पुरुषांना काम या प्रकारे गेली 17 वर्षे काम चालू आहे 1995 साली अंसरवाडा गावातील नरसिंग झरे या तरुणाने गोपाळांच्या वस्तीत शिकवण्यासाठी संपर्क केला. एकवेळ गोड भाताचे जेवण दिले, भिक्षा न मागता पोटाला अन्न मिळू लागले. त्यातून शिक्षणाची ओळख झाली. आज या वस्तीत 50 मुले शिकत आहेत, 40 मुले बालवाडी ते चौथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. 10 मुले 5 वी ते 8 वी या वर्गात शिकत आहेत. पालावरची शाळा, बालवाडी, गोकुळ महिला उत्पादन केंद्र, गोकुळ बँड कंपनी इ. उपक्रम सुरू आहेत. महिला बचत गटाच्या सखुबाई बंडी धनगर या प्रमुख आहेत. पुणे येथे जाऊन त्यांनी 6 महिन्यांचे वाखाच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. येथे बनवलेल्या वस्तूंना अजंठा-वेरूळ महोत्सवात बचत गटाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 60 पुरुषांची तीन बँड पथके काम करीत आहेत. त्यातून त्यांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. लोक लोकसहभाग व देणगी यातून गोपाळ समाजातील लोकांसाठी घरांचे बांधकाम सध्या चालू आहे. त्यातील 12 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. बाकीच्या कुटुंबांना घरे लवकर देण्यात येत आहेत. अनिकेत अकिंचित,असहाय्य अशा भटके विमुक्त समाजाला विकासाच्या दिशेकडे नेण्यासाठीचा हा प्रयत्न.

प्रशंसापत्रे